Aushadhashivay Arogya (औषधाशिवाय आरोग्य) by Govind Mahadev Chiplunkar| Natural Health Solutions|Live a Healthy, Happy, and Balanced Life Without Medication
औषधाशिवाय आरोग्य किंवा ‘आरोग्यमार्ग प्रदीप’
शारीरिक व मानसिक आरोग्य हेच ऐहिक व पारलौकिक सुखाचा मुख्य पाया आहे. औद्योगिक राजकीय व सामाजिक सुधारणेने मानवजातीच्या सुखात भर पडते यात संशय नाही; परंतु जोपर्यंत मानवजातीच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जात नाही, तोपर्यंत इतर सुधारणांमुळे होणाऱ्या सुखापासून मानवजातीचा कायमचा फायदा होत नाही ही गोष्ट मानवजातीच्या आतापर्यंतच्या इतिहासाचे अवलोकन करणाऱ्यांना सहज दिसून येणार आहे. वाफ, वीज व हवा इत्यादी पंचमहाभूतांवर आपल्या बुद्धिचातुर्याने अंमल चालविणारा मानवप्राणी एखाद्या क्षुल्लक रोगास, वैद्यकशास्त्राची इतकी प्रगती झाली असतानाही बळी पडावा, हा एकविसाव्या शतकातील चमत्कार आहे असे म्हटल्यावाचून राहवत नाही. मानवजातीच्या ऐहिक व शारीरिक सुखाची निसर्गाने सर्व व्यवस्था उत्तम करून ठेवली असता, सर्व मानवजातीस जन्मल्यापासून निरनिराळ्या रोगांशी टक्कर देत देत शेवटी त्यासच बळी पडावे लागते, ही गोष्ट अत्यंत विचार करण्यासारखी आहे. आरोग्य, सुख, समृद्धी हा आपणा सर्वांचा नैसर्गिक हक्क असता त्याऐवजी रोग, दुःख व दारिद्र्य ही त्रयी आपल्या सर्वांच्या मागे लागावी, याचे कारण निसर्गनियमांचे उल्लंघन हेच होय, हेच सर्वांना पूर्ण विचारांती आढळून येणार आहे. मोठमोठ्या उत्क्रांतिशास्त्रज्ञांचे असे मत आहे की, मानवजातीस या पृथ्वीतलावर उत्पन्न होऊन जरी अनेक शतके लोटली आहेत, तरी वेळेच्या मानाने पूर्वी जी त्यांच्या शरीराची स्थिती होती, तीत अजून फारशी सुधारणा झालेली नाही.
रोग नाहीसे करून त्या जागी आरोग्याची स्थापना करण्यास व मानवजातीस आरोग्य, सुख, समृद्धी, यावरील जन्मसिद्ध हक्क मिळवून देण्यास, निसगनियमांचे ज्ञान व त्यांचे अनुकरण या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. या महत्त्वाच्या विषयाकडे विचारवंतांचे लक्ष लागावे, निसर्गाचे नियम तरी काय आहेत या गोष्टींबद्दल विचार व मननही सुरू व्हावे व पाश्चिमात्य देशांतील वैद्यकांत होत असलेल्या आधुनिक शोधांचा प्रसार होऊन सर्व बंधू-भगिनीस अगदी कमी खर्चात रोग नाहीसे करून आरोग्य प्राप्त करून घेता यावे, याकरिता हे पुस्तक अत्यंत प्रेमाने व नम्रपणाने आमच्या सर्व बंधू भगिनीस अर्पण करीत आहोत. नैसर्गिक राहणीने आरोग्य प्राप्त करून घेणे हा विषयच इतका महत्त्वाचा व मोठा आहे की. या पुस्तकात या विषयातील काही काही मुख्य अंगांची फक्त दिशा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण जनसमूहात व विशेषतः डॉक्टर व वैद्य वर्गात, आरोग्य मिळविण्याच्या कामात स्वतंत्र विचारास व सत्यान्वेषणास या पुस्तकाने सुरुवात झाल्यास पुस्तक प्रसिद्ध करण्याचा हेतु बऱ्याच अंशामे सिद्धीस गेला, असे म्हणता येईल. ज्याप्रमाणे पाश्चात्त्य देशांत या विषयाचा अभ्यास सर्व दुराग्रह बाजूस ठेवून सर्व मतांच्या लोकाकडून होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशातही सर्वांनी या अत्यंत उपयुक्त विषयाचा अभ्यास, मोकळ्या मनाने करावा व आपल्या प्राचीन वैद्यकाची प्रगती करून घ्यावी एवढीच सर्वांस अत्यंत आग्रहाची सूचना आहे.
'आरोग्य मार्ग प्रदीप' किंवा औषधाशिवाय आरोग्य हे पुस्तक प्रथम १९२२ साली प्रसिद्ध झाले होते. माणसाचे आरोग्य हे डॉक्टरवर किंवा वैद्यावर अवलंबून नसून, निसर्गावर अवलंबून असते व निसर्ग हाच खरा वैद्यराज असतो. या तत्त्वाचाच विस्तार या पुस्तकात सविस्तर केला आहे. सध्याच्या पिढीने हा विचार अमलात आणण्याजोगा आहे. असे वाटल्यामुळे याचे पुनर्मुद्रण हाती घेतले आहे. सर्वांनी या पुस्तकाचे बारकाईने मनन व अध्ययन करावे यात फायदा त्यांचाच आहे. अशा या उपयुक्त पुस्तकाची नवी आवृत्ती मराठी जनतेच्या हाती देताना आम्हाला आनंद होतो आहे.