Upanishadantil Daha Goshati
निरनिराळ्या उपनिषदांतील दहा सुंदर बोधप्रद कथा या छोट्या पुस्तकांत सांगितलेल्या आहेत. हिंदुस्थानातील आर्य लोकांच्या संस्कृतीचा पाया उपनिषत्कालांत घालण्यात आला. खाणीतून काढलेला हिरा घेऊन त्याला निरनिराळे पैलू पाडतात व नंतर त्याला कोंदण करून तो अंगावर धारण करतात; त्याचप्रमाणे निरनिराळे समाज आपल्यामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांच्या मनावर निरनिराळे संस्कार करून त्यांचे उपजत तेज़ अधिक खुलून दिसावे आणि त्यांच्यामुळे समाजाला शोभा यावी, म्हणून प्रयत्न करीत असतात. ते सर्व संस्कार मिळून त्या समाजाची संस्कृति होत असते. प्रत्येक समाजातील नव्या पिढीच्या नजरेसमोर पूर्वी होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चारित्र्याचे आदर्श ठेवण्यात येत असतात. भरतखंडांतील आर्यांच्या पुढे हजारो वर्षे उपनिषत्कालीन ऋषी, त्या ऋषींचे आश्रम, त्यांतील ऋषिकुमार, ब्रह्मवेत्त्या आर्यस्त्रिया आणि त्या सर्वांचे ब्रह्मविद्येच्या संबंधींचे विचार व अनुभव हे ठेवण्यात आलेले आहेत. आर्य संस्कृतीला आधारभूत असलेल्या या गोष्टींचा मुलांना लहान वयापासून परिचय व्हावा आणि उपनिषदें म्हणजे आहे तरी काय, त्यांत काय सांगितले आहे, याचे थोडेसे ज्ञान त्यांना व्हावे म्हणून हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या मातापितरांनी किंवा गुरुजींनी थोडीशी मदत केल्यास या दहा गोष्टींपासून मुलांना बराच बोध होईल व उपनिषत्कालीन काही थोर व्यक्तींचे विचार व स्वभाव यांचे त्यांच्या मनावर चांगलेच ठसे उमटतील, अशी आशा आहे.