Suvicharacha Khjina (सुविचारांचा खजिना) By H A Bhave
दोन हजार पाचशे सुविचारांचे हे एकच पुस्तक आहे. त्यात, मूळ विचारवंतांच्या नावांसहित त्यांचे इंग्लिश सुविचार आणि खाली त्यांचे मराठी भावानुवादही श्री. ह.अ. भावे यांनी करून दिले आहेत, हा अनुवाद शब्दशः नसून प्रत्येक सुविचाराचे मराठीत 'सार' देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सुविचारांची पुनरावृत्ती जवळजवळ नाही. इंग्लिश सुविचार देताना त्यातल्या मूळ विषयाच्या शब्दाप्रमाणे ' अकारविल्हे ' (अल्फाबेटिकल) देऊन मग त्यांचा भावानुवाद दिला आहे. संस्कृत भाषेत सुभाषिते, म्हणजे अनमोल असे असंख्य सुविचारच आहेत. पण, सात दशकांपासून एकंदर मराठी विद्यार्थ्यांचा ओढा इंग्लिश भाषेकडेच वळला म्हणून हा दोनहजार पाचशे इंग्लिश सुविचारांचा संग्रह, मराठी भाषेतल्या भावानुवादासहित देण्याची भावे यांनी खटपट केली आहे. कोणत्याही भाषेतले सुविचार म्हणजे त्या भाषासाहित्यातून घुसळून काढलेले 'नवनीतच' असते. ते जणू त्यांच्या विचारांचे सारच असते. श्री. ह. अ. भावे म्हणतात, "खरं म्हणजे अडीच हजार सुविचारांची गरज नाही' एकाच ' सुविचाराने माणसाचे जीवन बदलू शकते, पण तुमच्या जीवनाला अर्थ देणारा, तुम्हाला मनापासून पटणारा तो सुविचार नेमका कोणता हे कळणे अवघड असल्याने अडीच हजार सुविचारांचा हा द्रोणगिरी तुमच्या समोर ठेवला आहे ' जो सुविचार तुम्हाला आवडेल, तो घरात ठळक जागी लिहून ठेवा व येता-जाता वाचन करा. अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन याला फक्त तीन अक्षरी सुविचार आवडला तो म्हणजे ' Time is Money ' ( समय हीच संपत्ती ) आणि त्याप्रमाणे त्याने त्या केवळ एकाच सुविचाराच्या अंमलबजावणीने आपले, बहुरंगी व्यक्तिमत्त्व घडवले व जगाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. ज्यांचे आयुष्य अजून घडायचे आहे, अश्या विद्यार्थी व तरुणांसाठी हे पुस्तक तयार केलं आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. "