Surtechi Swari(सुरतेची स्वारी) By Prabhakar Bhave
मोगल सरदार शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसनी तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती. राजगडापासून ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत शहर सुरत त्यावेळी मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. युरोप, आफ्रिका तसेच मध्यपूर्वेशी येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई. या व्यापारावरील करातून मोगलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळे. सुरतेचे शहर मोगलांच्या साम्राज्य सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर असूनसुद्धा सुरतेला बलाढ्य तटबंदी करण्यात आलेली होती. या किल्ल्यावर व आसपास ५,००० सैनिकांची तरतूद होती. सुरतेतील आर्थिक व भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला.