Shree Namdev Charitra by Madhavrao Appaji Mule (Waikar)

Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price
माधवराव आप्पाजी मुळे लिखित श्रीनामदेव चरित्रावरील लो. टिळक यांचा अभिप्राय

नामदेव चरित्र आम्ही समग्र वाचून पाहिले. ग्रंथाची भाषा सोपी, सरळ व शुद्ध असून विषयविवेचनही पद्धतवार केले आहे. ज्या महाभगवद्भक्तांनी जवळ- जवळ शतकोटी कवने करून प्राकृत जनांच्या उद्धारार्थ भक्तिमार्गाची या देशांत सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर इतर संत मंडळींच्या सहाय्याने तो मार्ग परिपूर्णतेस आणला त्या सत्पुरुषाचे साधार चरित्र आजपर्यंत कोणीच प्रसिद्ध केले नाही हे आश्चर्य होय. नामदेव यांनी आपल्या अभंगांतून जागोजाग आपल्या पूर्वजांचा वृत्तांत, आपल्या जीवनातील ठळक गोष्टी, आपला जन्मकाळ, समाधिकाळ आणि तत्कालीन इतर संतमंडळींचा वृत्तांतही दिला आहे, पण ते अभंग आजपर्यंत कोणी मिळवून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला नव्हता; त्यामुळे प्राकृत भक्तिमार्गाच्या संस्थापकाची खात्रीलायक माहिती ही अर्थात उपलब्ध नव्हती. प्रस्तुत ग्रंथकारांनी पुष्कळ परिश्रमाने ही माहिती मिळवून ती या ग्रंथात साधार नमूद केली आहे. यावरून नामदेवांचाच काय, पण त्यांचे समकालीन ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव ह्यांचेही समाधीकाल निश्चयाने ठरविता येतात. असो. एकंदरीत पहाता हे चरित्र भक्तमंडळीस पसंत होईल यात शंकाच नाही. परंतु महाराष्ट्र - कवितेचा अभिमान बाळगणारांनीही हे संग्रही ठेवण्यासारखे आहे. नामदेवांचा काल एकंदर हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासात फार महत्त्वाचा आहे. यावेळी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर प्रांतातूनही याच संतमंडळींनी भक्तिमार्गाची स्थापना करून प्राकृत जनांस मार्गास लावले. ज्ञानदेव, नामदेव, कबीर, नानक इत्यादि निरनिराळ्या प्रांतातील संतमंडळीच्या भेटी व संवाद फार महत्त्वाचे आहेत व त्यांची जितकी माहिती मिळेल तितकी थोडीच. प्रस्तुत ग्रंथात अशा तऱ्हेची माहिती जितकी मिळाली तिकी देण्याचा प्रयत्न केला आहे. भगवद्भक्त, कवी व भक्तिमार्गाचे संस्थापक अशा तीन तऱ्हेने नामदेवांचे चरित्र महत्वाचे आहे. याकरिता सर्व महाराष्ट्र लोक या ग्रंथास चांगला आश्रय देतील अशी आशा आहे.