Shivkalin Maharashtra (शिवकालीन महाराष्ट्र) by V K Bhave
कै. वा. कृ. भावे. (1885 ते 1963) 1930 ते 40च्या दरम्यान 8 वर्ष 'केसरी'चे संपादक होते. त्यांनी अनेक वर्ष सखोल अभ्यास करून 'मुसलमानपूर्व महाराष्ट्र' खंड 1 व 2, 'शिवकालीन महाराष्ट्र' व 'पेशवेकालीन महाराष्ट्र' अशा चार पुस्तकांमधून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास सिद्ध केला. यासाठी त्यांनी अभ्यासिलेल्या संदर्भग्रंथांची यादी खूप मोठी आहे. त्या यादीवरून त्यांच्या मेहेनतीची कल्पना येते. त्यांनी 'शातवाहन' घराण्यापासून सुरुवात करून चौथ्या पुस्तकात 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत हा इतिहास आणून सोडलेला आहे. या चार पुस्तकांना 19व्या व 20व्या शतकाचा सामाजिक इतिहास जोडल्यास 'महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास' परिपूर्ण होईल. सामान्य माणसाला राजकीय इतिहासाची व त्यातील घडामोडींची माहिती फारशी आवडत नाही. परंतु इतिहासकाळात 'सामाजिक स्थित्यंतरे कशी घडत गेली?' याविषयी त्याला कुतुहल असते. 'राजवटी येतात व जातात' परंतु समाजाचा प्रवाह मात्र अखंड वाहत असतो. समाजाची जडणघडण या सामाजिक इतिहासातूनच समजत असते. म्हणून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या सामाजिक इतिहासाच्या अभ्यासाची जरूर आहे. पण नेमका हा सामाजिक इतिहासच दुर्लक्षित राहिला आहे. हा इतिहास खूप मनोरंजकही आहे. 'मुसलमानपूर्व महाराष्ट्रा' मध्ये महाराष्ट्रातील मंदिरे, धर्मपंथ, ज्ञानोपासना, कलाकौशल्य यांची माहिती मिळते. 'शिवकालीन महाराष्ट्रा'मध्ये स्वराज्याचा कारभार, चलन, शिक्षण अशा अनेक विषयांची माहिती मिळते आणि शिवकालीन समाज कसा असेल याचे जिवंत चित्र तुमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' हा तर अपूर्वच ग्रंथ आहे. या काळातील माहितीही मोठ्या प्रमाणात मिळते. पाणीपुरवठा, ज्योतिष, गायन, व्यापार, जमीन महसूल, लष्कर अशा अनेक अंगांनी 'पेशवेकालीन महाराष्ट्राचा' अभ्यास वा. कृ. भावे यांनी केला आहे. पेशवाईमध्ये पालखी बाळगण्याचा परवाना किंवा सनद सरकारकडून मिळत असे. त्याप्रमाणेच 'घड्याळ बाळगण्या'चीही 'सनद' सरकारातून घ्यावी लागत असे. अशा मजेदार हकिकतीही यात आढळतील. पेशवाईत 'गणेशोत्सव' वगैरे सण कसे साजरे केले जात. समाजातील अन्य समजुती दास-दासी ग्रामव्यवस्था, सत्पुरुषांची समाजसेवा, जातींचे हक्कसंबंध अशा अनेक विषयांवर वा. कृ. भाव्यांनी सखोल विवेचन केले आहे. ही अलीकडे दुर्मिळ झालेली पुस्तके म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवाच आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा हा परिश्रमपूर्वक केलेला अभ्यास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावा या हेतूने हे पुनर्मुद्रण 'वरदा प्रकाशना'ने हाती घेतले.