Sanskrit Marathi Shabdhkosh By Janadarn Vinayak Ok
Regular price
Rs. 1,000.00
Sale price
Rs. 1,000.00
Regular price
Save 0
प्राध्यापक जनार्दन विनायक ओक यांनी हा कोश इ.स. 1915 मध्ये लिहून स्वत:च प्रसिद्ध केला होता. त्यावेळी या कोशाचे नाव 'गीर्वाण लघुकोश' असे होते. या कोशाच्या पुढल्या काळात दुसरी व तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. 'वरदा बुक्स'ने छापलेली ही नवी आवृत्ती आहे. या कोशाचा विशेष असा आहे की, संस्कृत शब्दांचा मराठीत अर्थ देणारा हा पहिलाच कोश आहे. कोशाच्या रचनेचे धोरण व स्वरूप सामान्यतः असे आहे. रामायण-महाभारत, मनुस्मृती, पंचतंत्र, उपनिषदे, महाकाव्ये, भागवत व प्रसिद्ध नाटके असे ग्रंथ वाचण्यास या कोशाचा उपयोग व्हावा म्हणून त्या ग्रंथातील शब्द येथे घेतले आहेत व शब्दांचा अर्थ देऊन त्यापुढे ग्रंथातील नक्की स्थळ दिले आहे. सर्व ग्रंथातील आधार प्रामुख्याने देण्याचे धोरण ठेवलेले आहे. मात्र त्या ग्रंथांचे पृष्ठक्रमांक वगैरे दिले नाहीत कारण निरनिराळ्या आवृत्तीत ही पाने वेगवेगळी असतात. इंग्रजी अमदानीत संस्कृत भाषा इंग्रजी माध्यमातून शिकविली जात असे. म्हणून त्याकाळी वामन शिवराम आपटे यांचा संस्कृत-इंग्रजी कोश खूपच लोकप्रिय होता. स्वातंत्र्यानंतर संस्कृतचे शिक्षण जरी मराठीतून सुरू झाले तरी संस्कृत शिकणारा विद्यार्थी वर्ग दिवसेंदिवस कमीच होत चालला आहे. त्यामुळे संस्कृत-मराठी कोशाची जरी जरूर असली तरी असा कोश छापणे हे एक वेडे धाडसच आहे. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्तीच्या वेळेसही कोश छपाईसाठी प्रचंड आर्थिक अडचणीतून त्या-त्या प्रकाशकाला जावे लागलेले आहे. या कोशाचे काम महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षण सुरू करणारे समर्थ विद्यालयाचे चालक विजापूरकर यांच्या प्रेरणेने हाती घेण्यात आले. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच कोशकार्य करण्यात आलेले आहे. कोश- कसा वापरावा यासंबंधी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. ज्या-ज्या ग्रंथांचा आधार घेण्यात आला त्यांचे ग्रंथसंक्षेपही दिलेले आहेत. संस्कृत भाषेच्या अभ्यासाला हा कोश अत्यावश्यक आहे. जुने अभिजात ग्रंथ पुन्हा छापून प्रसिद्ध करण्याच्या 'वरदा बुक्स'च्या धोरणानुसारच हा कोश प्रसिद्ध करत आहोत.