Sankirna lekhsangrah (संकीर्ण लेखसंग्रह) By Vishwanath Kashinath Rajwade

Regular price Rs. 550.00
Sale price Rs. 550.00 Regular price
Save 0

वि. गो. विजापूरकर यांनी ग्रंथमाला हे मासिक विसाव्या शतकाच्या प्रारंभी कोल्हापूरहून चालवले होते. मासिकाच्या शिल्लक प्रतीतूनच पाने जोडून 'संकीर्ण लेखसंग्रह' या पुस्तकाच्या काही प्रती तयार झाल्या. हे पुस्तक अतिदुर्मिळ आहे. या पुस्तकात राजवाडे यांचे बत्तीस लेख संग्रहित केले आहेत, त्यातील निम्म्यापेक्षा जास्त लेख प्राचीन मराठी कवींवर आहेत. काही लेख इतिहासावर व शीलालेखावर आहेत. 'शालातील स्वानुभव' हा लेख मात्र राजवाडे यांच्या शिक्षणातील अनुभवांवर आहे. रामदास यांच्यावरील लेख पन्नास पानांचा आहे. वि. का. राजवाडे यांच्या लेखनातील सर्व वैशिष्ट्ये या लेखात दिसून येतात. 'विरामचिन्हासंबंधी काही सूचना' असे व्याकरणावरीलही लेख यात आहेत. एकंदरीत यातील कुठल्याच लेखाची अभ्यासकाला उपेक्षा करून चालणार नाही. कादंबरी हा चाळीस पानांचा प्रबंधही १९०६ पर्यंतच्या मराठीतील कादंबरीचा मागोवा घेणारा आहे. त्याबरोबर त्यांनी जागतिक वाङ्मयातील कादंबरी या प्रकाराचाही आढावा घेतला आहे.यातील प्रत्येक निबंधात काहीतरी वेगळा विचार मांडलेला आढळेल. मुक्तेश्वर, दासोपंत, देवदास व मुकुंद, शिवदिनकेसरी, तुकाराम, मुकुंदराज, रघुनाथपंडित, आनंदतनय अशा अनेक जुन्या कवींवर लेख यात दिलेले असले तरी प्रत्येक लेखात स्वतंत्र संशोधनाची बीजे आढळतील. रामदासांवरील हा दीर्घ निबंध लिहिताना दासबोध आणि हेगेल याचे तत्वज्ञान यातील साम्यस्थळे राजवाडे दाखवितात, तसेच दासबोधात फारशा प्रक्षिप्त ओव्या आलेल्या नाहीत असेही ते दाखवून देतात. रामदासांवरील हा प्रदीर्घ निबंध फारच महत्वाचा आहे. राजवाड्यांचे समाजाचे जे मंडळीकरण झाले पाहिजे असे जे मत होते तेही मत रामदासांवरील या निबंधात डोकावताना दिसते. याप्रमाणे या ग्रंथातील बत्तीस निबंधांपैकी बहुसंख्य निबंधांची थोरवी किती आहे हे सहज स्पष्ट करता येईल. या ग्रंथाचे पुनर्मुद्रण डॉ.रा.चिं. ढेरे यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची राधामाधवविलासचंपू, महिकावतीची बखर, लेखसंग्रह - १ व लेखसंग्रह - २व३ अशी चार पुस्तके यापूर्वीच 'वरदा प्रकाशन' ने छापली आहेत. हे पाचवे पुस्तक आहे. आणखी काही पुस्तके उपलब्ध झाल्यास तीही छापण्याचा 'वरदा प्रकाशन' चा विचार आहे.