Sampurna Mahabharat by Bhalba Kelkar (Khand 1 te 8)|Complete Mahabharata in Simple Marathi – 8 Book Collection
संपूर्ण महाभारत
महाभारत व रामायण हे आमचे राष्ट्रीय ग्रंथ आहेत. त्यातील व्यक्ती आमच्या जीवनाशी एकरूप झालेल्या आहेत. राम, सीता, धर्म, द्रौपदी, भीष्म, हनुमान इत्यादी रामायण-महाभारतातील चरित्रांनी सर्व भारतीय जीवन आज हजारो वर्षे भारून टाकले आहे. जगातील इतर महाकाव्यातील पात्रे अशी लोक-जीवनात मिसळून गेलेली दिसत नाहीत. ह्या दृष्टीने महाभारत आणि रामायण हे निःसंशय अद्भुत ग्रंथ आहेत. रामायण हे मधुर नीतिकाव्य आहे तर महाभारत हे व्यापक समाजशास्त्र आहे. व्यासांनी एक लक्ष संहिता लिहून असंख्य चित्रे, चरित्रे व चारित्र्ये मोठ्या कौशल्याने यथावत् रेखाटली आहेत. केवळ निर्दोष एका परमेश्वराशिवाय कोणीही नाही; पण तसेच ह्या जगात केवळ दोषपूर्ण असेही कोणी नाही, ही गोष्ट महाभारत स्पष्टपणे सांगत आहे. भीष्म-युधिष्ठिर अशासारख्यांचे येथे दोषही दाखविले आहेत. उलट कर्ण-दुर्योधनादिकांचे गुणही प्रकट केले आहेत. मानवी जीवन हे पांढऱ्या व काळ्या तंतूंचा पट आहे ही गोष्ट महाभारत सांगत आहे. अलिप्त राहून भगवान् व्यास जगातील विराट संसाराच्चे छायाप्रकाशमय चित्र दाखवीत आहेत. व्यासांच्या ह्या अत्यंत अलिप्त व व उदात्त ग्रंथन-कौशल्यामुळे महाभारत ग्रंथ म्हणजे एक सोन्याची प्रचंड खाण बनला आहे. शोधन करून भरपूर सोने लुटून घ्याजे.
सारी गीता सांगतल्यावर भगवंतांनी प्रश्न केला," अर्जुना, गेला मोह ?" अर्जुन म्हणाला," देवा, मोह मेला. स्वधर्माचे भान झाले." अशाप्रकारे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार जुळवून पहिल्यास मोहनिराकरण हेच फलित निघते. गीतेचेच नव्हे, तर महाभारताचेही हेच उद्दिष्ट आहे. व्यासांनी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की, "लोकांच्या हृदयातील मोहावरण घालविण्यासाठी मी हा इतिहास प्रदीप पेटवीत आहे."
गीताप्रवचनामधून - विनोबा भावे