Sambhashan Chaturya(संभाषणचातुर्य ) By H A Bhave
या जगात ज्यांनी यश मिळविलेले असते' ती माणसे नक्कीच संभाषण चतुर असतात. थोर नेते तर आपल्या बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडतात. व त्यांचे आयुष्यही बदलून टाकतात. महात्मा गांधीही असेच नेते होते. जवाहरलाल नेहरूंचे पिताजी मोतीलाल नेहरू यांचे संपूर्ण परिवर्तन महात्मा गांधींनी केवळ संभाषणातून केले. म्हणून संभाषणचातुर्याचे महत्व अपार आहे. ज्याला समाजात पुढे जायचे त्या प्रत्येकाला ही कला यायला हवी. या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिली सहा प्रकरणे ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या पुस्तकातून घेतलेली आहेत. तर भाग दोन मध्ये सोळा प्रकरणे असून सोळाव्या प्रकरणात तुमचे सभाषण सुधारण्याचे पन्नास सोपे उपाय दिलेले आहेत. ज्याला संभाषणचतुर व्हायचे आहे त्याने हे पन्नास उपाय तोंडपाठ करायला हवे. संभाषण फक्त दुसऱ्याशीच करायचे असते असे नव्हे. तुमच्या मनाशीही संभाषण केल्याने विचार स्पष्ट होत जातात. संभाषणात कौशल्य मिळविल्याने अनेक प्रकारचे फायदे होत असतात. जो उद्योजक व्यवसाय करणारा आहे त्याची भरभराट संभाषणचातुर्यानेच होत असते. ज्याला लोकप्रियता मिळवायची आहे, त्याने नाना विषयांचे वाचन करून आपले ज्ञान वाढविले पाहिजे, कारण समाजात नाना प्रकारची माणसे असतात त्यांच्या आवडीचे विषयही भिन्न-भिन्न असतात म्हणून संभाषणचातुर्य आत्मसात करणारा 'जॅक ऑफ ऑल ट्रेडस' असला पाहिजे म्हणजे त्याला प्रत्येक विषयात थोडी-थोडी माहिती हवी म्हणजे तो कोणत्याही माणसाशी संभाषण करू शकेल. संभाषण करायचे म्हणजे आपणच सतत बडबड करायची असे नव्हे तर, ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही त्याप्रमाणे संभाषण करण्यासाठी दोन किंवा जास्त माणसे लागतात. म्हणून दुसऱ्याचे बोलणे लक्षपूर्वक व रस घेऊन 'ऐकुन घेणे' हा सुद्धा एक संभाषणाचाच भाग असतो. लोक तुमची बडबड ऐकायला आलेले नसतात तर त्यांनाही काही सांगायचे असते म्हणून संभाषणात दुसऱ्यालाही बोलते करणे यालाही फार महत्व आहे. संभाषण चातुर्यावरील हे पुस्तक वाचून तुमचा खूपच फायदा होणार आहे म्हणून हे पुस्तक पुन्हा-पुन्हा वाचावे असेच आहे.