Ramprasad Bismil Yanche Aatmcharitra(रामप्रसाद बिस्मिल यांचे आत्मचरित्र) Dr V L Dharurkar
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुती देणाऱ्या तरुण क्रांतिकारकांच्या यादीत रामप्रसाद शर्मा उर्फ बिस्मिल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. इंदौर संस्थानातील एका छोट्या गावात जन्मलेल्या या तरुण क्रांतिकारकाने आपल्या शालेय शिक्षणाच्या काळात 'आर्य समाज' सारख्या ध्येयवादी चळवळीत उडी घेतली. पुढे लोकमान्य टिळकयुगातील सशस्त्र क्रांतिकारकांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी अनेक गुप्त योजना आखल्या आणि त्या कृतीमध्ये आणल्या.काकोरी कांड हे त्यांच्या क्रांतिकार्याचे यशशिखर होते. लोकमान्य टिळकांच्या प्रखर राष्ट्रवादाचा त्यांच्या जीवनावर विलक्षण प्रभाव होता. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यापासून शहीद भगतसिंग यांच्यापर्यंत क्रांतिकारकांची एक अखंड मालिका स्वयंतेजाने तळपते. त्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल हे एक तेज: पुज व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचार व कार्याचा प्रभाव भारतीय राष्ट्रवादाच्या रचनात्मक विकासावर पडल्याचे दिसून येते. आधुनिक भारताच्या सर्वांगिण विकासाचे त्यांचे स्वप्न या आत्मकथेमध्ये प्रभावीपणे प्रतिबिंबित झाले आहे. ते कविमनाचे क्रांतिकारक होते. उर्दू भाषेत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर गीतांना तोड नाही. अशा ह्या महाकवीचे हे आत्मकथन मराठी भाषेत प्रथमच प्रकट होत आहे. हा एक भावानुवाद आहे. हे एक विचारमंथन आहे. 'ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदयी हृदय एक जाहले' असा हा आध्यात्मिक संवाद आहे. अनुवादकर्ता केवळ निमित्त आहे. - डॉ. वि. ल. धारुरकर