Pratapgad Yudha (प्रतापगड युद्ध ) By Prabhakar Bhave

Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price
Save 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधी जितक्या काही गोष्टी आपणाला कळू शकतील त्याबाबतची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे. कारण अवघ्या वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अघटीत अशी कामे करून अशक्य कोटीतील गोष्ट शक्यतेच्या कोटीत आणून सोडली. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल लोकांना चमत्कार वाटू लागला. देवदेवतांचा अन् देवळांचा विध्वंस करीतच चालून आलेल्या अफजलखानाचे पोट फाडले, त्याच्या सैन्याचा पार चुराडा उडाला. विजापुरी सैन्याला पळता भुई थोडी अशी अवस्था झाली. तेव्हा लोकांच्या मनावर महाराजांच्या कर्तृत्वाचा एवढा पगडा बसला की नरसिंह अवतारानंतर घडलेली एकमेव घटना शिवाजी महाराजांच्याच हातून घडू शकते म्हणजे सामान्य प्रजा त्यांना नरसिंह म्हणजे विष्णूचे अवतार असे संबोधू लागली. ह्या मागे "परित्राणाय साधुनाम् विनाशायत्त दुष्कृताम्" असे गीतेतील ओळीचे आशय साधल्यामुळे सामान्य प्रजेला एक मोठा भावनिक दिलासा 'शिवछत्रपतींच्या रूपाने मिळाला होता.
     अफजलखानाची स्वारी व त्याचा वध हे शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक रोमहर्षक पर्व आहे. अफजलखान प्रचंड सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी दाखल झाला होता. अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या सेनेशी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तुंबळ युद्ध करावे लागले. एका अर्थी हा लढा विषम होता, तरीही तो शिवाजी महाराजांनी जिंकला. महाराष्ट्राच्याच काय पण जागतिक युद्ध संदर्भातही या युद्धाला तोड नाही. या युद्धाची माहिती इतिहासात फारच थोडी आढळते. या पुस्तकाचा प्रमुख विषय अफजलखानाच्या सेनेशी शिवाजी महाराजांचे युद्ध हाच आहे. त्यामळे या युद्धाची हकीगत विस्ताराने येथे दिली आहे. युद्धाची ही कथा साठ वर्षांपूर्वी कॅप्टन मोडकांनी लिहिली होती पण ते पुस्तक आता दुर्मिळ आहे.
     या पुस्तकात फक्त प्रतापगड युद्धाचेच वर्णन आहे असे नाही. युद्धाच्या सुरुवातीस झालेला अफजलखानाचा वध, अफजलखानाची स्वारी का झाली त्याची कारणे, तत्कालीन महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण या सर्वांचा ऊहापोह येथे केलेला आढळेल. युद्धाच्या मागची पार्श्वभूमी तसेच आसपासच्या मुलखाचे वर्णन, त्यावेळची हत्यारे, त्यावेळच्या युद्धातील डावपेच या सर्वांचे वर्णन या पुस्तकात केलेले आढळेल. या युद्धाचा सर्वांगाने विचार या पुस्तकात केलेला आहे.
      या पुस्तकाचे लेखक श्री. प्रभाकर भावे यांनी महाराष्ट्रातील किल्लेकोट पायी फिरून अनेकदा निरीक्षिले आहेत. किल्ल्यांची व शिवकालाची त्यांच्या मनालाच ओढ आहे. प्रतापगड युद्ध-व्यूह तपशीलवार, समजून घ्यावा म्हणून प्रतापगडाच्या अनेक वाल्या प्रभाकर भावे यांनी केल्या आहेत.