Pandurang Mahatmya(पांडुरंग माहात्म्य ) By Dr Ramchandra Chintaman Dhere
ह्या ग्रंथाची दोन वैशिष्ठ्ये
पहिले- ग्रंथमाहात्म्य- ह्या ग्रंथाच्या, डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या प्रस्तावनेत 'महत्त्वाचा उल्लेख आहे तो असा, 'कवी श्रीधर नाझरेकर कृत 'पांडुरंगमाहात्म्य' ह्या ग्रंथाचे अभ्यासात्मक ग्रंथ-माहात्म्य वर्णन परदेशात केंव्हाच पोचलेले आहे'...ते मराठी अध्यात्मिक काव्यरचनांचे युरोपियन अभ्यासक डॉ. आय. एम. पी. रिसाईड यांनी सन १९६५ मधेच लंडनच्या 'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज'च्या बुलेटिन मधे (मुखपत्रात) लिहून ठेवले आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ग्रंथाची कीर्ति लंडन पर्यंत केंव्हाच पोचली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे.
दुसरे कविमहात्म्य- हे कवी श्रीधर यांचे व्यक्तिमहात्म्य आहे. ह्या 'पांडुरंग माहात्म्य' ग्रंथाचे रचनाकार कवी- श्रीधर नाझरेकर ह्यांच्या बालपणी मनात अध्यात्मिक बुध्दिनिर्मिती बाबतच्या एका 'दंतकथेबाबतचे' आहे. ते वयाच्या तिसऱ्या वर्षी कीर्तनकार व चुलते रंगनाथ यांच्याबरोबर जाण्या ऐवजी 'पंढरपुरात रंगनाथ यांना कीर्तनासाठी यायला उशीर होईल' हा फक्त निरोप द्यायला, पंढरपुरात आधीच गेले. त्यावेळी ते वयाने केवळ तीन वर्षाचे असावे ( श्रीधर चारित्रा नुसार ), तिथे जयरामस्वामी, संत तुकाराम, समर्थ रामदास इत्यादी अनेक संतसमुदाय उपस्थित होता. तो निरोप ऐकून 'समर्थ रामदास म्हणाले' ठीक आहे... मग तूच कीर्तन सुरू कर ! 'तेंव्हा श्रीधर एकदम रडत-रडत पुन्हा पळत घरी गेले तेंव्हा रंगनाथ यांनी त्याला' तोंड उघडुन जीभ बाहेर काढण्यास सांगितले, तशी जीभ बाहेर काढताच त्यांनी जिभेवर बोटाने 'श्री' असे अक्षर लिहिले. त्या क्षणीच त्यांना अध्यात्मिक बुध्दि प्राप्त झाली. आणि मग त्यानंतर त्यांच्या हातून 'श्री शिवलीलामृत' पोथी सारखे अनेक पोथीरूप साहित्य रचले गेले. तेंव्हापासून त्यांचे नाव 'श्रीधर' पडले. त्या आधी त्यांची आई त्यांना लाडाप्रेमाने 'खंडोबा' अशी हांक मारीत असे. ( ही दंतकथा 'श्रीधर' चरित्रात छापलेली आहे )