Nikita Raje Chitnis By Dilip Bhide
मी, दिलीप भिडे, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची डिग्री घेतल्यावर १५ वर्षे निरनिराळ्या स्टील प्लांटमध्ये नोकरी केली. नंतर टेक्निकल मॅनेजरची नोकरी सोडून नागपूर MIDC मध्ये इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलचा कारखाना सुरू केला. 22 वर्षे कारखाना चालवल्यावर २०१० मध्ये कारखाना बंद करून निवृत्ती स्वीकारली.
मुलाने CA झाल्यावर पुण्याला प्रॅक्टिस सुरू केली. सध्या पुण्याला मुलाकडे स्थायिक आहे.कोविडमुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये सीनियर सिटिजन लोकांनी घराबाहेर पडू नये, असा सरकारी हुकूम निघाला आणि आमच्यासारख्या निवृत्त झालेल्या,पण सतत व्यस्त राहण्याची सवय असणाऱ्या लोकांपुढे मात्र प्रश्न चिन्ह उभं राहीलं. घरात बसून करायचं तरी काय? वेळ कसा घालवायचा? मनात आलं की, ही व्यथा आपण लोकांसमोर मांडायला पाहिजे. पण व्यथा लिहायला बसलो आणि व्यथा बाजूलाच राहिली आणि एक कादंबरीच कागदावर उतरली. सर्व मित्रांनी वाखाणलेली ही कादंबरी आज वाचकांसमोर ठेवताना मला खूप आनंद होत आहे.
या कादंबरीची नायिका निकिता ही एक साधी सरळ पण अतिशय हुशार मुलगी आहे. ती स्वत:च्या हुशारीने आणि कर्तबगारीने यशाचं एक-एक शिखर सर करत जाते. पण तिच्या निरागस स्वभावामुळे ती एका भयंकर रहस्यमय चक्रव्यूहात अडकते. तिच्या जीवन-मरणाचाच प्रश्न उपस्थित होतो. तिची मती गुंग होते. काय होईल पुढे? सर्व प्रश्नांची उत्तरं या कादंबरीत मिळतील.
दिलीप भिडे