Marathyanchya Rajyakatha(मराठ्यांच्या राज्यकथा) By Govind Sakharam Desai
इतिहास चित्ताकर्षक व स्फूर्तिदायक करावा अशी पुष्कळांची सूचना असून माझ्याही मनात हा विचार आज कैक वर्षे घोळत आहे. सवडीनुसार मराठ्यांच्या इतिहासातील कित्येक प्रसंग निवडून मी त्यांची कथानके लिहून काढिली; आणि प्रकाशक यांनी वारंवार कळकळ व्यक्त केली म्हणूनच एकवीस गोष्टीचा हा संच तयार होऊन वाचकांपुढे ठेवण्याची मला संधी मिळाली.
लघुकथा, कादंबरी इत्यादीचे अलीकडे एक तंत्र बनले आहे ते मला अवगत नाही. मी आपल्या मनाने संवाद, भाषणे, स्वगत विचार, जिथे जसे योग्य वाटले तसे दाखल करून एकवीस गोष्टीत दोनशे वर्षांचा संकलित इतिहास सांगितला आहे. त्यातही कित्येक अपरिचित प्रसंग मी मुद्दाम निवडले आहेत. प्रमुख व्यक्तींची चरित्र व स्वभावभेद, तसेच त्यांचे पराक्रम अनुषंगाने मनात सहज ठसावे असा माझा प्रयत्न आहे. कित्येक तत्कालीन पत्रांचे व लेखांचे उतारेही परिचयासाठी दाखल केले आहेत. ही माझी अल्प सेवा वाचकांनी गोड मानून घ्यावी अशी प्रार्थना आहे.