Marathyanchae ladyanche Eithihas (मराठ्यांच्या लढायांचा इतिहास ) By S M Paranjape
या पुस्तकामध्ये मराठ्यांच्या कित्येक लढायांची वर्णने देण्यात आलेली आहेत. ही वर्णने पूर्वी चित्रमयजगत्च्या निरनिराळ्या अंकांतून निरनिराळ्या वेळी प्रसिद्ध झालेली असून हल्ली ती वर्णने एकत्र करून या पुस्तकाच्या रूपाने महाराष्ट्रीय वाचकांच्या पुढे ठेवण्यात येत आहे. या युद्धविषयक वर्णनांच्या लेखमाला प्रथमतः इ. स. १९२५ सालाच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरूवात करण्यात येऊन ती लेखमाला इ. स. १९२८ च्या मे महिन्यापर्यंत चाललेली होती. ही लेखमाला चित्रमयजगत्च्या प्रत्येक महिन्याच्या अंकामध्ये नियमितपणे प्रसिद्ध होत असे, असे नाही. अनेक कारणांमुळे मध्यंतरी कित्येक वेळा प्रत्येक महिन्याला ही वर्णनं छापण्याकरिता देणे शक्य झालेले नव्हते. तेव्हा अशा प्रकारचे हे काही अपरिहार्य अपवाद सोडून बोलावयाचे झाल्यास ही लेखमाला चित्रमयजगत्मध्ये सुमारे तीन वर्षेपर्यंत चालू होती. असे म्हणण्यास हरकत नाही. या लेखमालेत ज्या लढायांची वर्णने देण्यात आलेली आहेत, त्या लढायांच्या दृष्टीने या लेखमालेचे एकंदर अदमासे पंधरा भाग कल्पिलेले आहेत. त्यापैकी चौदा भागांत चौदा स्वतंत्र आणि मोठमोठ्या अशा लढायांची वर्णने असून "महाराष्ट्रातील किल्ले" या मथळ्याच्या एकाच भागामध्ये कुलाबा, सातारा, बेळगाव, सोलापूर, नाशिक, खानदेश वगैरे जिल्ह्यांतील निरनिराळ्या किल्ल्यांवर ज्या लढाया झाल्या, त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.