Marathey V Engraj (मराठे व इंग्रज) By N. C. Kelkar
साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी, पेशव्यांचे राज्य बुडाले यास शंभर वर्षे झाली त्यावेळी; 'मराठेशाहीचे शतसांवत्सरिक श्राद्ध' म्हणून जे पुस्तक लिहिले, तेच हे 'मराठे व इंग्रज' हे पुस्तक. अर्थातच त्याचा लेखनकाल सन 1918 असा आहे. कीर्तनात जसे दोन भाग असतात, त्याप्रमाणे मराठे व इंग्रज या आख्यानाचे पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग केले. आहेत.
भारतात तरी मराठे व इंग्रज यांचा उत्कर्ष समकालीन आहे. 1660च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा पराभव केला आणि सन 1666 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेट ताब्यात घेतले. या दोन्ही घटना समकालीनच आहेत. महाराष्ट्रात इंग्रज येण्यापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती याचे विवेचन पहिल्याच प्रकरणात केले आहे. इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले? याचेही विवेचन केले आहे. इंग्रज या देशात परके होते व व्यापाराच्या हेतूने आले होते. त्यामुळे येथील शासकांशी इंग्रज अत्यंत नम्रपणे वागत. परंतु इंग्रजांचे सामर्थ्य वाढत गेले त्याप्रमाणे त्यांचा उत्साह व उद्धटपणा वाढतच गेला. खरे पाहिले तर पेशव्यांच्या ताब्यात अर्ध्यापेक्षा जास्त हिंदुस्थान होता. म्हणून इंग्रजांनी हिंदुस्थानचा ताबा मराठ्यांकडूनच मिळवला असे म्हणणे योग्य होईल. इंग्रज आणि मराठे यांच्या संबंधांचे सुरुवातीपासूनचे विवेचन या प्रबंधात्मक पुस्तकात केलेले असल्यामुळे हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐववजच झाला आहे. मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासकांना हे पुस्तक प्रमुख पुस्तकांप्रमाणेच वाटेल.
उत्तरार्धात (किंवा उत्तररंगात) मराठेशाहीचे राज्य कोणत्या कारणांमुळे बुडाले याचेही विवेचन केले आहे. तसेच मराठ्यांची राज्यव्यवस्था याविषयी प्रबंधात्मक लेखन उत्तरभागात आले आहे. या पुस्तकात सर्वात महत्त्वाचे लेखन म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेला उपोद्घात म्हणता येईल. या ग्रंथामुळे मराठ्यांचे सार्वभौम राज्य इंग्रजांनी कसे नष्ट केले व ताब्यात घेतले याचा विस्तृत गृहपाठच या ग्रंथात वाचायला मिळेल. म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी हे पुस्तक क्रमिक पुस्तकाप्रमाणेच वाचले पाहिजे.