Maharashtra Itihasmanjari Athava Nivadak Aitihasik Utare महाराष्ट्र इतिहासमंजरी अथवा निवडक ऐतिहासिक उतारे

Maharashtra Itihasmanjari Athava Nivadak Aitihasik Utare(महाराष्ट्र इतिहासमंजरी अथवा निवडक ऐतिहासिक उतारे)

Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price
गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रांत ऐतिहासिक साधने प्रकाशित करण्याचा उद्योग बराच नेटाने झालेला आहे. कैलासवासी निळकंठराव कीर्तने आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी प्रथम अशा प्रयत्नाची आवश्यकता प्रतिपादन केल्यानंतर रा. साने, राजवाडे, खरे, व पारसनीस यांनी संशोधनाचे काम जे एक वेळ उचलले ते त्यांनी अद्यापपर्यंत अव्याहतपणे चालविले आहे. याखेरीज अशा सामुग्रीवरून इतिहास लिहिण्याच्या कामास कैलासवासी म. गो. रानडे रियासतकार रा. सरदेसाई व प्रो. यदुनाथ सरकार वगैरे अनेक विद्वानांनी हात घातल्यापासून चरित्रे व ऐतिहासिक चर्चा याचेहि प्रमाण वाढत आहे. खेरीज पुण्यातील भारत-इतिहास-संशोधक-मंडळ, धुळे येथील रामदासी वाङ्मय- प्रकाशक मंडळ, ठाण्याचे मराठीदप्तर आणि कलकत्ता, मद्रास व अलाहाबाद येथील विश्वविद्यालये यासारख्या संस्थांनी प्रकाशनाचा भार अलीकडे अंगावर घेतल्यामुळे यापुढे इतिहास-साधनांचे प्रकाशन पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणावर होईल अशी चिन्हे दिसत आहेत. अशा वेळी आजवर प्रकाशित झालेल्या साधन-सामुग्रीचा मासला सामान्य लहान थोर मराठी वाचक वर्गापुढे मांडून त्यांना ऐतिहासिक वाङ्मयाच्या आल्हादकारक व पूर्वजांच्या स्मृति- सुवासाने दरवळणाऱ्या सुउपवनाकडे वळविणे आवश्यक आहे. अशा रीतीने ऐतिहासिक वाङमयोपवनांतील सुमनगुच्छ गुंफण्याचे काम उत्तम प्रकारे करू शकणारे अनेक विद्वान् महाराष्ट्रांत विद्यमान आहेत व ते हे काम अंगावर घेतील असे वाटून गेली सात आठ वर्षे मी वाट पाहिली. मध्यंतरी रा. गोविंदराव सरदेसाई यांनी अशा प्रकारचे निवडक उतारे पुस्तक रूपाने ग्रथित करण्याची आवश्यकता जाहीर रीतीने प्रतिपादन केली. पण कार्यव्यापृतत्वामुळे हे काम आपल्या हातून होणार नाही असे त्याच वेळी सुचविले. यामुळे वाट पाहात राहाण्यापेक्षा आपणच जमेल तसे हे काम पार पाडावे असे मनांत आणून मी गेल्या वर्षात वेचे काढण्याचा हा उद्योग केला. याची सामान्य रूपरेषा प्रो. दत्तो वामन पोतदार व ‘केसरीकार’ रा. न. चिं. केळकर, यांच्या सल्ल्याने ठरविली. तथापि हे काम जलदीने पार पाडण्यास चित्रशाळेच्या व्यवस्थापकांचे प्रोत्साहन व तगादा हीच विशेष उपयोगी पडली.
वेचे करतांना कोणती दृष्टि ठेवावी हे ठरविणे कठीण असते. आठ वर्षांपूर्वी मी केलेली निवड नवीन ऐतिहासिक माहिती ज्या पत्रांतून मिळते ती पत्रे एकत्र करावी या हेतूने केली होती. परंतु सामान्य वाचकांना या विषयाची गोडी लावण्याचा हेतु दृष्टीपुढे ठेवल्यावर फारशी व अपरिचित शब्दांनी गजबजलेल्या लांबलचक महजरांना व फर्मानांना बाजूस ठेवणे भाग पडले. यानंतर केवळ अस्सल पत्रे निवडण्याची आणि शुद्ध व जोरदार भाषेचे नमुने एकत्र करण्याची अशी द्विविध कल्पना स्नेह्यांनी मला सुचविली. तेव्हा केवळ एकच कल्पना न ठेवता रुचिवैचित्र्य हेच मुख्यतः मार्गदर्शक धरावे असे ठरवून मी निवड केली आहे. यामुळे कित्येक उतारे फारच लांबलचक आहेत तर कित्येक महत्त्वाचे उतारे यांत घेतलेलेच नाहीत वगैरे तक्रारी या व्यवसायात गढलेल्या विद्वानांना करता येण्याजोग्या आहेत. परंतु तीनशे पानांच्या पहिल्या पंक्तीस मला जितके उतारे बसविता आले तितके मी बसविले आहेत. यांत कैलासवासी रानडे, रा. केळुसकर, दळवी, चिंतामणराव वैद्य, ‘महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग’ लिहिणारे रा. गद्रे वगैरे अनेक नामांकित लेखकांच्या ग्रंथांतील उतारे आले नाहीत हे खरे, तथापि याचे कारण ऐतिहासिक वाङ्मयाचा व्याप एवढा मोठा झाला आहे की, अनुल्लेखाचा आक्षेप वेचे काढणाऱ्यास टाळता येणे दुर्घट आहे तथापि या दिशेने कोणी काही सुचविल्यास मजवर फार उपकार होतील; व त्याचा उपयोगहि होईल. कारण या मंजरीचा उत्तरार्ध छापावयास घ्यावयाचा आहे. त्यांतील वेचे काढतांना मला सूचनांचा उपयोग होईल व कदाचित या पूर्वार्धाची पुनः आवृत्ति निघाल्यास कोणते भाग गाळावे व कोणते नवीन घालावे हे ठरविताना या भागासंबंधीच्या सर्व सूचनांचा मला साक्षात उपयोग करून घेता येईल. सारांश या पूर्वार्धासंबंधाने इतिहासभक्तांनी आक्षेप, टीका व योग्यायोग्यतेची चर्चा वेळांत वेळ काढून करावी, अशी माझी आग्रहाची विनंति आहे. महाराष्ट्राचा इतिहास चांगल्या प्रकारे लिहिला जाण्यास आजपर्यंत झालेल्या कामापेक्षा व्हावयाचे काम शेकडो पटीने मोठे आहे ही गोष्ट सर्वसंमत आहे. तेव्हा ते काम पार पाडण्यास सामान्य वाचकवर्ग व नवीन पिढी यांना ऐतिहासिक वाचनाची अभिरुचि उत्पन्न करण्यावाचून गत्यंतर नाही असे वाटल्यावरून मी हा प्रयत्न केला आहे. तेव्हा विद्वानांनी परीक्षण करून वाट दाखविल्यास पुढील काम अधिक व्यवस्थितपणे करण्यास मला अवसर सापडेल.