Maharashtra Itihasmanjari Athava Nivadak Aitihasik Utare(महाराष्ट्र इतिहासमंजरी अथवा निवडक ऐतिहासिक उतारे) Dattatreya Vishanu Aapte
गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रांत ऐतिहासिक साधने प्रकाशित करण्याचा उद्योग बराच नेटाने झालेला आहे. कैलासवासी निळकंठराव कीर्तने आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी प्रथम अशा प्रयत्नाची आवश्यकता प्रतिपादन केल्यानंतर रा. साने, राजवाडे, खरे, व पारसनीस यांनी संशोधनाचे काम जे एक वेळ उचलले ते त्यांनी अद्यापपर्यंत अव्याहतपणे चालविले आहे. याखेरीज अशा सामुग्रीवरून इतिहास लिहिण्याच्या कामास कैलासवासी म. गो. रानडे रियासतकार रा. सरदेसाई व प्रो. यदुनाथ सरकार वगैरे अनेक विद्वानांनी हात घातल्यापासून चरित्रे व ऐतिहासिक चर्चा याचेहि प्रमाण वाढत आहे. खेरीज पुण्यातील भारत-इतिहास-संशोधक-मंडळ, धुळे येथील रामदासी वाङ्मय- प्रकाशक मंडळ, ठाण्याचे मराठीदप्तर आणि कलकत्ता, मद्रास व अलाहाबाद येथील विश्वविद्यालये यासारख्या संस्थांनी प्रकाशनाचा भार अलीकडे अंगावर घेतल्यामुळे यापुढे इतिहास-साधनांचे प्रकाशन पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणावर होईल अशी चिन्हे दिसत आहेत. अशा वेळी आजवर प्रकाशित झालेल्या साधन-सामुग्रीचा मासला सामान्य लहान थोर मराठी वाचक वर्गापुढे मांडून त्यांना ऐतिहासिक वाङ्मयाच्या आल्हादकारक व पूर्वजांच्या स्मृति- सुवासाने दरवळणाऱ्या सुउपवनाकडे वळविणे आवश्यक आहे. अशा रीतीने ऐतिहासिक वाङमयोपवनांतील सुमनगुच्छ गुंफण्याचे काम उत्तम प्रकारे करू शकणारे अनेक विद्वान् महाराष्ट्रांत विद्यमान आहेत व ते हे काम अंगावर घेतील असे वाटून गेली सात आठ वर्षे मी वाट पाहिली. मध्यंतरी रा. गोविंदराव सरदेसाई यांनी अशा प्रकारचे निवडक उतारे पुस्तक रूपाने ग्रथित करण्याची आवश्यकता जाहीर रीतीने प्रतिपादन केली.