Kenjalgadcha Kabja (केंजळगडचा कब्जा )By Vidhyadhar Vaman Bhide

Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price
Save 0

विद्याधर वामन भिडे यांची कादंबरी म्हटली की त्यातल्या प्रत्येक पात्राचे व्यक्तीवर्णन केल्याशिवाय कादंबरी सुरूच होत नाही. ह्या कादंबरीतील पहिल्याच 'धोंडीबा आणि कोंडीबा ' ह्या प्रकरणात त्यांच्या व्यक्तिमत्वाची वर्णने होऊनच सुरुवात झाली आहे. अशी त्यांची कादंबरी लिखाणाची खास शैली आहे यात वादच नाही. आणि त्या व्यक्ती वर्णनात वाचक गुंतून जातो आणि हळूहळू मंत्रमुग्ध होऊ लागतो. थोडक्यात ती कादंबरी त्याला 'चढू' लागते, आणि त्याच्या हातून ती खाली ठेवली जाणे त्याच्या मनाला अवघड होते. याच भावनेपोटी ह्या ग्रंथ प्रकाराला लेखन तज्ज्ञांनी 'कादंबरी' असं नामकरण केलं आहे, कारण 'कादंबरी' ह्या शब्दाचा अर्थच मुळात पिण्याची दारू,मद्य, किंवा मदिरा असा आहे.. ह्या कादंबरीच्या वाचनात वाचक जणू 'वाचनधुंद' होतो...अशी धुंदी ही कादंबरी वाचल्या शिवाय कळणार किंवा चढणार नाही....ह्या किल्ल्याचा पूर्वेतिहास म्हणजे तो किल्ला बाराव्या शतकात पन्हाळ्याच्या भोज याने बांधला. १६४८ मधे आदिलशहाने तो घेतला. त्यानंतर, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपले किल्ले हस्तगत करण्याच्या मोहिमेत हाही किल्ला घेतला... पण तोपर्यंत सव्वीस वर्षे लागली आणि त्यांना १६७४ मध्ये तो घेता आला...त्याच मोहिमेतल्या एकंदर नाट्यावर ह्या कादंबरीचा पाया रचलेला आहे. ह्या गडाजवळून एका खिंडीवजा रस्त्याने रायरेश्वराकडे जाता येते. पूर्व-पश्चिम अशी भौगोलिक रचना असलेल्या ह्या किल्ल्याच्या नैसर्गिक कातळात कोरलेल्या पायऱ्या सुध्दा पाहण्यासारख्या आहेत. तिथल्या 'तळ्या' जवळच्या 'केंजळाई माता' देवीच्या नावावरून घेराकेळंज, केळंजा आणि केंजळ गड अशी त्याला कालमानानुसार नावे पडली आहेत, मात्र छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी तो गड आपल्या कब्जात घेतल्यावर त्या गडाचे नाव 'मनमोहनगड' असे केले आहे. ह्या किल्ल्याच्या कब्जाच्या मसलतीच्या गुप्त बैठका पुण्यातल्या विठ्ठलवाडी मैदानात घडल्या असा त्यात उल्लेख आहे.