Kankan Bandhlelya Striya (कंकण बांधलेल्या स्त्रिया) By Shobha Bondre
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Save 0
कंकण म्हणजे बांगडी. ते तर सर्व स्त्रिया घालतात ! मग हे कंकण कोणते ? इतिहासकाळात वीरपुरुष हातात कंकण घालून 'मारू किंवा मरू' या भावनेने युद्ध जिंकण्यासाठी रणांगणावर 'जे' कंकण बांधून उतरत असत 'ते' हे कंकण आहे. असे कंकण बांधणे सोपी गोष्ट नाही. या कष्टकरी स्त्रियांच्या सतरा मुलाखतींतून त्यांच्या जीवनसंघर्षाची कथा उलगडत गेली आहे. यातील सर्व प्रसंग व घटना सत्य आहेत आणि सत्याचे दर्शन माणसाला नेहमीच थक्क करते.
आपल्या प्रस्तावनेत श्रीमती मृणाल गोरे म्हणतात, "या सर्व कष्टकरी स्त्रियांना परिस्थितीवर मात करून धडपडत राहण्याची प्रेरणा कशातून मिळते ? या स्त्रिया आपल्या दरिद्री संसारावर आपल्या मुलांवर नितांत प्रेम करणाऱ्या आहेत. आपल्यासारखी त्यांच्या जीवनाची परवड होऊ नये म्हणून चालवलेली अखंड धडपड हेच त्यांच्या जीवनाचे सार आहे." हरियानातील ८० वर्षांची वाल्मिकी समाजाची परमेश्वरी, जीवनाचे तत्त्वज्ञान एकाच वाक्यात सांगते, “कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है।" आयुष्यभर खटपट व श्रमाची कामे करून तिने गावाकडे धर्मशाळा बांधली आहे. या सर्व स्त्रिया समाजाच्या तळागाळातील आहेत, आपल्या रोजच्या पाहण्यातीलही आहेत. पण त्यांच्याबद्दल आपण विचार करतो का ? केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीने परिस्थितीवर मात करू पाहणाऱ्या खानावळवाल्या सुमतीबाईंना 'अन्नपूर्णा'च्या प्रेमा पुरव भेटल्या आणि त्यांचा कायापालट झाला. या सगळ्या स्त्रियांना थोडासा आधार मिळाल्यानंतर त्यांच्यात आमूलाग्र बदल कसा होतो, हे विमलाबाईंच्या उदाहरणावरून समजेल, आपल्या वाट्याला आलेले आयुष्य त्यांनी आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान बनवून कसे पचवले आहे, म्हणूनच बहुतेक सर्व स्त्रियांचा पती दारू पिणारा, व्यसनी, बसून खाणारा असला तरी कंकण बांधलेली स्त्री त्याला वेळप्रसंगी सोडूनही देते व आपल्या मुलांसाठी धडपडत राहते.
शोभा बोंद्रे यांनी विविध व्यवसायांतील कष्टकरी स्त्रियांचा हा आलेख आपल्या ओघवत्या व सहज भाषेत काढून त्यांच्या मुलाखतीतूनच आणि त्यांच्याच भाषेतून ही व्यक्तिचित्रे उभी केली आहेत. यातून आपल्या जीवनातील लहान लहान दुःखे कुरवाळत बसणाऱ्या आम्हा मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये काही रग, जिद्द आणि चौकटीपलीकडे काही करण्याची ऊर्मी निर्माण होईल का ?