Kabir Charitr Ani Dohe (कबीर चरित्र व दोहे) by H. A. Bhave|Sant Kabir Poetry|philosophy
कबीर चरित्र व दोहे
कबिराचे दोहे इतके आकर्षक व हृदयाला भिडणारे आहेत की आपण त्याचा मराठी अर्थ वाचताना सुद्धा त्यात अगदी एकरूप होऊन जातो. या दोह्यात खरोखर नाट्य भरपूर भरलेले आहे. या दोह्यातून कधी-कधी कबीर समोरच्या श्रोत्यांशी बोलत आहे असाच भास होतो. यात मनाला जाऊन भिडणारी छोटी छोटी रूपकेही अतिशय समर्पक आहेत. कबिराची कविता वाचताना त्याचा, उत्कट भक्ती करणारा स्वभाव आपल्याला जाणवतो. गंभीर तत्त्वज्ञान सांगताना सुद्धा कबिराच्या स्वभावातील मिश्किल खट्याळपणा आपल्याला जाणवतो. कितीही खट्याळपणा केला तरी कबिराचा गंभीरभाव व तत्त्वज्ञान डोळ्यातून कधीच नष्ट होत नाही. ज्ञानेश्वरी विषयी एकनाथ महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी समजण्यासाठी ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी लागते त्याचप्रमाणे प्रत्येक वाचकाने कबिराचा एकतरी दोहा अनुभवून पहावा असे सांगावेसे वाटते.
या पुस्तकात कबिराचे चरित्र व महत्त्वाचे दोहे दिले आहेत. तुकारामांच्या अभंगाप्रमाणेच कबिराच्या दोह्यातील अनेक चरण म्हणी रूप झाले आहेत. तुकाराम महाराज ज्या प्रमाणे 'तुका म्हणे' असा उल्लेख करतात त्याचप्रमाणे अनेक दोह्यात 'कबीर कहे' किंवा 'कहत कबीर'असा उल्लेख असतो. कबीरांच्या भाषेतील विविधता स्पष्ट होते, जसे कि'ब्रज,उर्दू,फारशी,अवधी,पंजाबी,भोजपुरी आणि मराठी शब्दांचा अप्रतिम संगम त्यांच्या काव्यात दिसतो. कबीराचे दोहे वाचताना जणू तो आपल्याशी बोलतोय, आपल्या प्रश्नांना उत्तर देतोय असा भास होतो. हे फक्त दोह्यांचे पुस्तक नाही तर हे आरसे आहे, जे आपल्या अंतरंगाचे प्रतिबिंब दाखवते.