Chintansutre : Bodh Manachya Shlokancha( चिंतनसूत्रे : बोध मनाच्या श्लोकांचा ) | Manache Shlok Book in Marathi with Meaning| Ramdas swami | Dasbodh |
चिंतनसूत्रे : बोध मनाच्या श्लोकांचा
ज्यावेळी परिस्थिती विपरीत असते त्यावेळी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदासांसारखा द्रष्टा महापुरुष जन्माला यावा लागतो. हे संत व्यावहारिक यशाचा मार्गही दाखवितात व अध्यात्मिक उन्नतीचा प्रसाद सर्वसामान्य व्यक्तीला मिळवून देतात. समर्थ रामदासांनी दासबोधासारख्या ग्रंथातून व्यावहारिक जीवनाचे धडे प्रत्येक व्यक्तीला दिले आहेत. मनाचे श्लोक हा त्यांचा अगदी छोटा ग्रंथ. त्यात अवघे २०५ श्लोक आहेत. परंतु या श्लोकांतून मानवी मनाचे कितीतरी पदर समर्थपणे उलगडून दाखविले आहेत. व्यक्तीच्या मनातील दुर्बलता काढून टाकून सन्मागनि वाटचाल कशी करावी याचे अतिशय सुस्पष्ट मार्गदर्शन या लोकांमध्ये केले आहे. अध्यात्म व व्यावहारिक जीवनाची ही इतकी सुरेख सांगड आहे, की त्यातून निराशाग्रस्त व्यक्ती आशायुक्त, कर्तृत्वशाली जीवनासाठी प्रवृत्त व्हावी. सर्वसामान्य प्रापंचिक आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळूनही सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी उद्युक्त व्हावा. अध्यात्माची ओढ असलेल्या व्यक्तीला परमार्थसाधनेबरोबरच व्यावहारिक जीवनातील आपली जबाबदारी सांभाळण्याचे भान यावे, व राजकारण अथवा समाजकारणामध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही अनैतिक मार्गाचा अवलंब न करता समाजातून मोठ्या प्रमाणावर जन व धन यांचे सामर्थ्य प्राप्त व्हावे.
या सर्व भूमिका कालातीत किंवा त्रिकालाबाधित अशा आहेत. आणि त्यामुळे ४०० वर्षापूर्वी समाज प्रबोधनासाठी समर्थ रामदासांनी सांगितलेले मनाचे श्लोक आजही तेवढेच कालोचित आहेत. या लोकांचेआजच्या संदर्भात काही स्पष्टीकरण देण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. समर्थांच्या सर्वच काव्यरचनांमध्ये अध्यात्मावर आधारित अशा प्रकारे उपदेश केला गेलेला आहे. यातील अध्यात्म साधनेचा कोणताही अभ्यास अथवा अधिकार लेखकाकडे नसल्याने या श्लोकांचा व्यावहारिक जीवनातील संदर्भ मांडण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यामुळे समर्थांच्या मांडणीच्या मूळ हेतूला कुठेही धक्का लागणार नाही असा विश्वास वाटतो. समर्थांचे मनाचे श्लोक हे मराठीत असले तरीही त्यांच्या शब्दांमध्ये पुष्कळ गूढार्थ भरलेला आहे. हा गूढार्थ समजून घेण्यासाठी 'मनोबोध' हे पूजनीय अनंतराव आठवले यांचे मनाच्या श्लोकांवरील पुस्तक आधार म्हणून वापरले. यापूर्वी समर्थांच्या जीवनावर शेकडो विद्वानांनी लेखन केलेले आहे. अनेक पैलूंनी त्यांच्या जीवनाचा व त्यांच्या वाङ्गयाचा अभ्यास केलेला आहे. परंतु तरीही मनाचे श्लोक वाचताना मनामध्ये जे विचार येतात, ते त्या त्या संदर्भात व्यक्त करणे योग्य वाटले.