Chatrapati Shivaji Maharaj (छत्रपती शिवाजी महाराज) By Krishnarao Arjun Keluskar
मराठीतील विस्तृत असे हे पहिलेच शिवचरित्र आहे, नंतरच्या काळात अनेक शिवचरित्रे लिहिली गेली, पण अग्रपूजेचा मान केळूसकरांच्या शिवचरित्रालाच दिला जातो. या पुस्तकात प्रकरणांऐवजी भाग म्हटले आहे व असे बत्तीस भाग आहेत. बत्तीसावा भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या भागात शिवाजी महाराजांचे गुणदोष विवेचन वस्तुनिष्ठ दृष्टीतून केलेले आढलेल. केळूसकरांच्या या शिवचरित्रामुळे महाराष्ट्रातील किमान दोन-तीन पिढ्यांना तरी स्फूती लाभली आहे. या दृष्टीनेही या शिवचरित्राचे महत्त्व अबाधित राहिले आहे व राहणार आहे. हे शिवचरित्र लिहिल्यानंतर अनेक संशोधनातून नवी माहिती उपलब्ध होऊन शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक अंगांनी प्रकाश पडला आहे. तरी पण जनमानसात शिवाजी महाराजांची जी प्रतिमा गेल्या चौऱ्यांशी वर्षात उमटलेली आहे ती केळूसकरांच्या शिवचरित्रातील शिवाजीमहाराजांचीच आहे. म्हणून या प्रतिमेला धक्का लावायचा नसेल तर केळूसकरांचे शिवचरित्र वाचले गेले पाहिजे. जगाच्या इतिहासात जे थोर राज्यकर्ते होऊन गेले त्यात शिवाजीमहाराजांची गणना होते. नेपोलियन हाही असाच शूर होता, पण शिवाजी महाराजांजवळ जे नैतिक सामर्थ्य होते व जे धार्मिक अधिष्ठान होते ते नेपोलियनजवळ नव्हते, म्हणून शिवाजी महाराज नेपोलियनपेक्षाही श्रेष्ठ होते हे मान्य करावेच लागेल. पण साहित्याच्या प्रांतात मात्र नेपोलियनवर एक लाख पुस्तके आहेत असे म्हणतात. त्यामानाने शिवाजी महाराजांवर खूपच कमी पुस्तके लिहिली गेली आहेत. म्हणूनच केळूसकरांचे जे सर्वांगसुंदर चरित्र आहे ते पुन्हा लोकांना उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. यासाठीच केळूसकरांचे हे शिवचरित्र 'वरदा प्रकाशन'ने शिवभक्तांना सादर केले आहे.