Chatrpati Rajaram Maharaj (छत्रपती राजाराम महाराज) By Vishanu Laxaman Kale
आपले पूर्वज, त्यांची अद्भुत कृत्ये, त्यांनी गाजविलेले पराक्रम इत्यादिकांचे विस्मरण किंवा तत्संबंधाने अनास्था हेच राष्ट्राच्या पतितकालाचे लक्षण होय' असे जे एका विद्वानाने म्हटले आहे, त्याप्रमाणे प्रस्तुत आपली स्थिति झाली आहे. म्हणून मराठ्यांच्या इतिहासातील अतिमहत्वाचा व प्रत्येक महाराष्ट्रीयाने लक्षात ठेवण्यासारखा जो काल - ज्यावेळी औरंगजेबासारख्या कट्टर धर्माभिमानी व महाप्रबल शत्रूने संभाजीराजांचा वध करून हिंदुपदपादशाहीचे निर्मूलन करण्याचा प्रसंग आणला त्यावेळी आपल्यातील कित्येक बुद्धिमान् व चतुर मुत्सद्यांनी आणि धाराशूर पुरुषांनी अकांडतांडव करून हिंदूचे हिंदुत्व राखले त्यांचे या पुस्तकात ऐतिहासिक कादंबरीरूपाने वर्णन करण्याचा मी यत्न केला आहे. आता तो कितपत साधला आहे व एकंदरीने भाषासरणी, सन्मार्गदर्शन, रसाविर्भाव वगैरे गुण कसे उतरले आहेत, याचे परिक्षण करण्याचे काम सुज्ञ वाचकांकडे सोपवितो.