Bhartiy Jyotishshastracha Etihas

Bhartiy Jyotishshastracha Etihas By Shankar Balkrishan Dikshit

Regular price Rs. 1,200.00
Sale price Rs. 1,200.00 Regular price

शंकर बाळकृष्ण दीक्षित हे शंभर वर्षांपूर्वीचे खगोलशास्त्रातील गाजलेले अभ्यासक होते. येथे प्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की, भारतीय ज्योतिःशास्त्र म्हणजे ज्याला सर्वसामान्य लोक भविष्यशास्त्र समजतात तो विषय नसून लेखकाला खगोलशास्त्र असे म्हणायचे आहेम्हणून या ग्रंथामध्ये भविष्यकथन किंवा त्याचा इतिहास सापडणार नाही.हे खगोलशास्त्र या एका विज्ञानशाखेच्या विषयावरचे पुस्तक आहे व त्यात खगोलशास्त्राची प्रगती भारतात वैदिक काळापासून कशी झाली याचेच विवेचन केले आहे. सुरूवातीच्या भागात तर ग्रहगती, अयन-चलन, विश्वसंस्था, विश्वाचे अपारत्व, युग म्हणजे काय, सायन चांद्र - सौरमाने अशा संपूर्णपणे शास्त्रीय विषयांचाच ऊहापोह केलेला आहे. नंतर वैदिक कालापसून सुरुवात करून शतपथब्राह्मणकाल, महाभारतकाल यावेळची खगोलशास्त्रातील भारतीयांची प्रगती योग्य त्या पुराव्यासह दिली आहे. ज्योतिः सिद्धांत कालाचे सविस्तर विवेचन देऊन प्राचीन व अर्वाचीन ज्योतिःशास्त्रज्ञांची (खगोलशास्त्रज्ञांची) सविस्तर माहिती दिली आहे. खगोल शास्त्रातून भविष्यशास्त्राचा कसा उगम झाला याचे विवेचन जातकस्कंध या प्रकरणात केले आहे. शेवटच्या सुचिपत्रात संस्कृत व संस्कृतेतर भाषेतील खगोलशास्त्रावरील ग्रंथांची विस्तृत यादीच दिली आहे.आपल्या देशात ज्योतिःशास्त्रज्ञानाची संपत्ती किती आहे ह्याची कल्पनाही लोकांना नाही. ही विलक्षण ज्ञानसंपत्ती पाहून प्रत्येक वाचक आश्चर्याने थक्क झाल्याखेरीज राहणार नाही. तसेच या ग्रंथातील ज्योतिःशास्त्रवृद्धीचा सगळा इतिहास वाचून आपल्या पूर्वजांचे विलक्षण प्रयत्न, शोध, जिज्ञासा कळून येऊन त्यावरून त्यांची योग्यता समजेल व मन आनंदाने उचंबळून जाईल.शं. बा. दीक्षित प्रस्तावनेत म्हणतात 'गणिताने अमूक गोष्टी निघतात असे लिहिले आहे ते सर्व गणित मी स्वतः लक्षपूर्वक केलेले आहे. आणि ते बिनचूक आहे अशी माझी खात्री आहे. दुसऱ्या ग्रंथाच्या आधाराने जेथे लिहावे लागले तेथे आधारग्रंथाच्या नावासह दिले आहेत. मूळ पुस्तकात युरोपिअन विद्वानांवर कडक टीका होती पण नंतर टीकेतील मुद्दे कायम ठेवून कडकपणा नाहीसा केला आहे.शं. बा. दीक्षितांनी या पुस्तकाखेरीज आणखी काही पुस्तके लिहिली होती. यापैकी 'ज्योतिर्विलास' अथवा 'रात्रीची दोन घटका मौज' या मनोरंजक पुस्तकाच्या पुढील काळात आवृत्त्या झाल्या.असे हे भारतीय ज्योतिःशास्त्राच्या इतिहासातील अपूर्व पुस्तक मराठीतील अभ्यासकांना 'वरदा प्रकाशनाने' पुन्हा उपलब्ध करून दिले आहे. रसिक वाचक व अभ्यासक या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे चांगले स्वागत करतील अशी खात्री आहे.