Amarkoshacha Shabdhkosh(अमरकोशाचा शब्दकोश) By Anantshastri Talekar
अमरकोशाचा अभ्यास संस्कृतचे विद्यार्थी करतात. अमरकोश हा अमरसिंह याने तयार केला. तो विक्रमादित्याच्या राजसभेतील नवरत्नांपैकी एक होता. अमरकोश हा समानार्थी शब्दांचा कोश असून तो 'दोन' हजार वर्षापुर्वी तयार झाला आहे. इंग्रजी भाषेतील पहिला समानार्थी शब्दकोश म्हणजे थिसॉरस 'रॉजेटस' या डॉक्टराने १८४८ मध्ये तयार केला. त्याला असा समानार्थी शब्दांचा शब्दकोश तयार करण्याची स्फूर्ती संस्कृत अमरकोशावरुनच मिळाली असे त्याने स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. अमरकोशावर संस्कृतमध्ये अनेक टीका व अभ्यास आहेत. पण ते सर्व संस्कृत भाषेतच आहेत, त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना अमरकोशातील शब्दांचा मराठी अर्थ समजणे अवघड जाते. म्हणून सन १८५३ सालीच अनंतशास्त्री तळेकर यांनी अमरकोशाचा शब्दकोश तयार केला व शिळा प्रेसवर छापला होता. तो आता अत्यंत दुर्मिळ झाला असून त्याची एखादी प्रतही मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात. हा कोश इतका महत्वाचा आहे की यावाचून अमरकोशाचा अभ्यास अपुराच राहातो. अमरकोशातील अनेक शब्दांचा मराठी अर्थ या कोशात दिला आहे. या वरुन या कोशाचे महत्व समजून येईल. या शब्दकोशाचे नाव तळेकर शास्त्रींनी संस्कृत प्राकृत शब्दकोश असे ठेवले होते. हाताने लिहून शिळाप्रेसवर छापलेली या पुस्तकाची मासिकाच्या आकाराची ४९९ पृष्ठे होती. पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आले की हा शब्दांचा अर्थ मराठीत देणारा कोश आहे. म्हणून आम्ही त्याचे नाव अमरकोशाचा शब्दकोश असे बदलले. संस्कृतच्या अभ्यासकांना हा कोश अतिशय उपयोगी पडेल अशी आमची खात्री आहे. दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध करुन देण्याच्या धोरणानुसार हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.