250 Sarth Sanskrut Subhashite(अडीचशे सार्थ संस्कृत सुभाषिते ) By H A Bhave
पृथिव्यां त्रीणि रत्नानी । जलम् अन्नम् सुभाषितम् ||मूढैः पाषाणखण्डेषु । रत्नसंज्ञा विधीयते ||
म्हणजेच ह्या पृथ्वीवर जल,अन्न आणि सुभाषिते अशी तीन रत्ने आहेत पण मूर्ख लोक दगडांच्या तुकड्यांनाच रत्नं असे नाव देतात.
वरील सुभाषित ज्यानी रचले त्या कवीच्या मते ह्या पृथ्वीवर पाणी आणि अन्न यांच्या इतकेच महत्त्व सुभाषितांना आहे. कारण अन्न-पाण्याप्रमाणेच सुभाषितांमुळेही माणसाचे चारित्र्य घडते. त्याला 'माणूसपण' प्राप्त होते आणि त्याबरोबरच 'जगात कसे वागावे' हेही समजते.म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने जमतील तितकी सुभाषिते जमवून त्यांचा अर्थ आत्मसात केला पाहिजे. संस्कृत भाषेत सुभाषितांचे फार मोठे भांडार आहे.साहित्यरत्नांची ती तर खाणच आहे.शेकडो किंवा हजारो वर्षांचे शहाणपण आणि अनुभव ह्या सुभाषितांत साठवलेले आहे.
ज्ञानाचा हा प्रचंड साठा अक्षरशः न संपणारा आहे.
एकदा ह्या रत्नभांडाराचा पत्ता लागला की,त्यातील ज्ञानवैभव किती लुटावे व किती न्यावे असे होऊन जाते. म्हणूनच की काय,पॅरिस येथील सॉरॉबॉना विद्यापिठातील संस्कृतचे प्राध्यापक लुडविक बाख युरोप सोडून हिमालयाच्या पायथ्याशी येऊन राहिले. सुभाषितांचे सहा 'प्रचंड खंड' प्रसिद्ध केल्यावर त्यांनी भारतातच देह ठेवला. जगातील कोणत्याही भाषेमधे संस्कृत सुभाषितांसारखे अपूर्व लेणे आढळत नाही.
अशा ह्या प्रचंड सुभाषितांच्या महासागरातून समूद्रमंथन करून जणू नवनीत रूपानेच ही सुभाषित गोळा केली आहेत.सर्व विद्यार्थ्यांसाठी हा मौल्यवान ठेवा 'वरदा प्रकाशन प्रा. लि.'ने सादर केला आहे.